देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरवरून अमित शहांचा फोटो गायब
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री जाहीर करून देवेंद्र फडणवीसांनी केलेला त्याग संपूर्ण राज्यात चर्चेचा तर भाजप कार्यकर्त्यांसाठी कौतुकाचा विषय आहे. अशातच नागपुरातील त्यांचे खंदे समर्थक व माजी महापौर संदीप जोशी यांनी त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर भाजपचे नेते अमित शहा यांचे छायाचित्र नसल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
जोशी हे नागपूरचे माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष होते. तसेच ते फडणवीसांचे खंदे समर्थक असून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अभिजित वंजारीकडून ते पराभूत झाले होते. तेव्हा त्यांचा गेम केल्याची चर्चा होती. तर आता अमित शहा यांनी फडणवीसांचा गेम केल्याची चर्चा आहे. संदीप जोशी यांनी लावलेल्या बॅनरवर “देवेंद्र तू कोणत्या मातीचा बनला आहेस?’ अशी भावनिक साद घालण्यात आली आहे. या बॅनरवर अमित शहा वगळून इतर सर्वांची छायाचित्रे आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणतात...
महाविकास आघाडी सरकार खाली खेचण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री म्हणून पदावनती होण्यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व फडणवीस यांच्यातील सुप्त संघर्ष कारणीभूत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच सत्तास्थापनेच्या जल्लोषातही फडणवीसांसह काही प्रमुख नेते सहभागी न झाल्याने फडणवीस नाराज आहेत, असे बोलले जात आहे. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र हे कारण खोडून काढत “आमच्यात सलोख्याची नाती आहेत, याचा ज्यांना मत्सर वाटतो त्यांच्याकडेच या चर्चा सुरू आहेत,’ अशा शब्दांत त्याचा खुलासा केला आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेच्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते.
“लांगूलचालन करणारे हिंदुत्व आणि प्रखर हिंदुत्व यातील हा निर्णय असून, देवेंद्र फडणवीस यांनी प्रखर हिंदुत्वाच्या विचारांच्या आनंद दिघेंच्या शिष्यास मुख्यमंत्री करण्यासाठी मोठा त्याग केला,’ अशा शब्दांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर टीका केली. पालघरमधील हत्याकांड, श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनावर आणलेली मनाई, त्याच्या निधी संकलानावर केलेली टीका, दारू दुकाने उघडण्यास परवानगी देऊन मंदिरे उघडण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, घाटकोपर उड्डाणपुलास छत्रपतींचे नाव देण्यात करण्यात आलेली टाळाटाळ आणि मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे हे लांगूलचालन करणारे हिंदुत्व आहे, असे ते म्हणाले.