फेरीवाल्यांची धक्काबुक्की; अंबरनाथ नगरपालिकेकडून कारवाई तीव्र

फेरीवाल्यांची धक्काबुक्की; अंबरनाथ नगरपालिकेकडून कारवाई तीव्र

Published by :
Published on

मयुरेश जाधव | अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला फेरीवाल्यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी सायंकाळी अंबरनाथ शहरात घडली होती. या घटनेनंतर अंबरनाथ पालिकेनं फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे.

अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात स्टेशनच्या बाहेरच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फेरीवाल्यांनी बस्तान मांडलं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता फेरीवाल्यांनी गिळंकृत केला असून त्यामुळे पादचार्‍यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. याच फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचं पथक बुधवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेलं होतं. यावेळी कारवाईदरम्यान फेरीवाले आणि त्यांच्यासोबतच्या काही जणांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली, तसंच कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर फेरीवाल्यांच्या विरोधात अंबरनाथ नगरपालिकेने कुठलीही पोलीस तक्रार न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

मात्र या घटनेनंतर अंबरनाथ नगरपालिकेनं आज सकाळपासूनच फेरीवाल्यांवर कारवाई अधिक तीव्र केली आहे. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात फेरीवाल्यांवर सध्या जोरदार कारवाई सुरू आहे. सोबतच कालच्या घटनेचा व्हिडीओ पाहून पोलिसांत तक्रार करणार असून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही अंबरनाथ नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी आणि अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख संदीप कांबळे यांनी सांगितलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com