अमरावतीत हॉटेलला लागलेल्या आगीत एकाचा दुर्दैवी मृत्यू
अमरावती(सुरज दाहाट): अमरावती शहरातील राजापेठ परिसरात असलेल्या हॉटेल इंपेरियाला आज रात्री ३ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला असून दिलीप ठक्कर असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. राजापेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे इतर नागरिकांचे प्राण वाचले.
राजापेठ परिसरात आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि आगीने हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे दिलीप ठक्कर यांचा दुर्देवी मृत्यू झाला. दिलीप ठक्कर हे एका केबल टीव्ही कंपनीमध्ये विदर्भ विभागाचे प्रमुख होते आणि त्याच कामाच्या संदर्भात ते अमरावतीमध्ये आले होते. काम आटोपल्यानंतर दिलीप ठक्कर रात्री राजापेठ परिसरात असलेल्या हॉटेल इंपेरिया आराम करण्यासाठी गेले होते. रात्री तीनच्या सुमारास हॉटेलला आग लागली आणि मोठ्या प्रमाणात धुर पसरला. या धुरामुळेच ठक्कर यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
हॉटेल इंपेरियाच्या समोरच राजापेठ पोलीस ठाणे असून रात्री पेट्रोलींगवर असलेल्या पोलिसांच्या पथकाला आग लागल्याचे दिसले असता त्यांनी अग्निशामक विभागाला तातडीने याची माहिती दिली. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आली. या आगीत हॉटे मध्ये मुक्कामी असलेले पाच व्यक्ती सुदैवाने वाचले. ठक्कर यांच्या मृत्यूची बातमी समजताच शहरातील अनेक केबल ऑपरेटरनी धाव घेतली. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनकरिता जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून राजापेठ पोलीस पुढील तपास करीत आहे. हॉटेल इम्पेरियाचे फायर ऑडिट झाले आहे की नाही?, आग नेमकी कशामुळे लागली?, याचाही तपास राजापेठ पोलीस करत आहेत.