महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकू नये – अजित पवार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात अडकले. यावरुन विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्या रोखठोक सदरातून अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले असल्याच्या गौप्यस्फोट केला आहे. यावरुन आता राष्ट्रवादीमधून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राऊतांच्या या मतावर टीका केली आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसाहेब हे सर्वोच्च नेते आहेत. ते पक्षातील कोणत्या नेत्याला मंत्री करायचे याचा निर्णय घेत असतात. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या पक्षातील कोणत्या नेत्यास मंत्री करायचे याचा निर्णय घेत असतात. तोच प्रकार काँग्रेसमध्ये देखील आहे. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालू असताना कुणी यामध्ये मिठाचा खडा टाकू नये असे असं अजित पवार म्हणाले.
संजय राऊत यांनी काय लिहिलं?
संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून लिहिलं आहे की, देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. राऊतांनी म्हटलं आहे की, या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असं त्यांनी म्हटलं आहे.