मास्क नसल्यास 500 रुपये तर थुंकल्यास 1000 रुपये दंड – अजित पवार

मास्क नसल्यास 500 रुपये तर थुंकल्यास 1000 रुपये दंड – अजित पवार

Published by :
Published on

राज्यात दररोज आढळणाऱ्या कोरोना रूग्णांचा आकडा वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत माहिती दिली. यावेळी मास्क नसल्यास 500 रुपये तर थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

त्यानुसार जिल्ह्याती पहिली ते आठवीपर्यंतच्या ऑफलाईन शाळा बंद करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, निर्बंध अधिक कडक करण्यात आल्याची देखील त्यांनी माहिती दिली. याचबरोबर, "माझी समस्त पुणेकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आम्हाला टोकाचं कुठलं तरी पाऊल उचलायला लावू नका." असा सूचक इशारा देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिला. या पत्रकारपरिषदेस राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची देखील उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मला सर्वांनाच आवाहन करायचे आहे की, सध्या करोना परिस्थितीही बिकट होत चाललेली आहे. कोरोना संसर्ग वाढत आहे. मी आता बीएमसीचे आयुक्त चहल यांच्याशी देखील बोललो, तेव्हा त्यांनी सांगितले की मुंबईतही रुग्ण संख्या मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईने ऑफलाईन शाळा पहिली ते आठवीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. नववीची शाळा सुरू ठेवली का तर १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय झालेला आहे.

त्यामुळे ते शाळेत आल्यानंतर त्यांना लसीकरण करणं सोपं जातं. त्यासाठी त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी देखील मी बोललो, त्यांनी सांगितलं की याबद्दलचा स्थानिकांना अधिकार दिलेला आहे की तिथली परिस्थिती काय आहे ते पाहून त्यांनी निर्णय घ्यावा. आज इथे बैठक घेत असताना, पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर ७४ टक्केच नागरिकांनी लशीचा दुसरा डोस घेतलेला आहे. माझी समस्त पुणेकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आम्हाला टोकाचं कुठलं तरी पाऊल उचलायला लावू नका."

"काहीबाबतीत आज आम्ही महत्वाचे निर्णय घेतोय. परंतु जी ३६ टक्के लोक लस घ्यायची राहिलेली आहेत त्यांनी दुसरा डोस घेतलाच पाहिजे. कारण, दोन्ही लशीचे डोस घेतले आणि जरी करोनाचा संसर्ग झाला तर त्याची तीव्रता कमी राहते, अशा प्रकारचा अनुभव हा आता पाहायला मिळतोय. तसेच, पुणे जिल्हा आणि दोन्ही महापालिका या संदर्भात असा निर्णय घेण्यात आला आहे की, पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. नववीची शाळा सुरू राहील. तर, पहिली ते आठवीच्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू राहतील. आज आम्ही हा सगळा निर्णय घेत असताना, आयसीएमआरचे महासंचालक भार्गव यांच्याशी देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलले. त्यांनी देखील सांगितलं की, ही जर परिस्थिती १० टक्क्यांच्या पुढे गेलेली असेल"

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com