महाराष्ट्र
गोंदियात प्रहार संघटनेचे विहिरीत बसून आंदोलन, सिंचनाचे पैसे थकल्याने शेतकरी आक्रमक
गोंदिया जिल्ह्यात 13 हजार सिंचन विहिरी कार्यक्रमाअंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर केल्या. शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकामही पूर्ण केले. मात्र सिंचन विहिरीचे थकीत असलेल्या लाखो रुपये अनुदान मिळण्यासाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विहिरीत बसून आंदोलनाला सुरुवात केली आहे.
जोपर्यंत शासन सिंचन विहिरीचे अनुदान देत नाही, तोपर्यंत विहिरीतच बसून राहण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचे बांधकाम धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही सिंचन विहिरीचे अनुदान दिले नाही.
शिवाय वीज जोडणी ही देण्यात आलेली नाही. संबंधित विभाग आणि शासनाला अनेकदा निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता प्रहार संघटना आक्रमक झाली आहे.