शिर्डीनंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावरील भोंगेही उतरणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर पोलिस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या असून याचा फटका शिर्डीच्या साईमंदिराला बसला. साईबाबांची पहाटे होणारी काकड आरती आणि रात्री 10.30 ला होणारी शेजारती आता लाऊडस्पीकर विनाच पार पडणार असून याचा फटका पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरालाही बसणार आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे उतरत नाही तोपर्यंत मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली जाणार, असा इशारा त्यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. परिणामी राज ठाकरे यांच्या भोंगा बंदी आंदोलनाचा फटका विठ्ठल मंदिराला बसणार आहे. पहाटेची काकडआरती आणि संध्याकाळी दुपारती नामस्मरण आणि आरतीसाठी वापरण्यात येणारे भोंगे बंद करावे लागणार आहेत. मात्र, अज्ञाप यावर निर्णय झाला नसल्याने आज पहाटेची काकडआरती भोंग्यावर झाली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांनी मुंबईतील मंदिर, चर्च, गुरुव्दारा तसेच सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांच्या ट्रस्टींची बैठक घेतली. या सर्वांना रितसर लाऊडस्पीकर परवानगीसाठी अर्ज करण्यास सांगितले. ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. लाऊडस्पीकर न लावताही आवाज झाला तरी कारवाई करणार, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. फक्त एक महिन्याच्या कालावधीसाठी परवानगी देणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ट्रस्टींनी वर्षभर परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, कायद्यानुसार इतक्या कालावधीसाठी परवानगी देता येत नसल्याचे आयुक्तांनी सांगितलं. मंदिर तसेच इतर धर्मांच्या प्रार्थनास्थळांनी परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं.
आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांशिवाय
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याबाबत आवाज उठविल्यानंतर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. कुर्ला येथील एससीएलआर जवळील विभागात तीन ते चार मोठ्या मशिदी आहेत. त्यामुळे इथे पहाटे 6 च्या आधीच मोठ्या आवाजात अजान होत असे. मात्र, आज या विभागात नमाज पठण झाले. पण लाउडस्पीकरवर अजाण झाली नाही. दरम्यान, मुंबईमधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टींनी एकत्र येत पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे.