Ganesh Festival 2021 | गणेश विसर्जनासाठी नियमावली जाहीर
आजच राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यासाठी परवानगी नाकारली आहे. आता त्या पाठोपाठ मुंबईतील गणेश विसर्जनासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिका आणि गणेश मंडळांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार सार्वजनिक मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच चौपाट्यांवर गणेश मूर्तीचं विसर्जन करता येणार आहे.
मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची सोमवारी (दि. २३) बैठक पार पडली. या बैठकीत विसर्जन मिवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, चौपाट्यांवर गणेश मूर्तीचं विसर्जन करता येणार आहे. गणेश उत्सवाबाबत या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.
विसर्जनाचे नियम
चौपाट्यांवर विसर्जनासाठी १० कार्यकर्त्यांनाच परवानगी
गेल्या वर्षीप्रमाणंच यंदाही सार्वजनिक गणेश उत्सवाचे नियम लागू राहणार.
सार्वजनिक उत्सवासाठी गणेश मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती गणेशाच्या मूर्तीची उंची दोन फूट असेल.
गर्दी होणार नाही याची काळजी गणेश मंडळांनी घ्यायची आहे.
मुंबई महापालिका ८४ ठिकाणं विसर्जनाची सोय उपलब्ध करुन देणार.
सर्वात महत्वाचा बदल म्हणजे विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सार्वजनिक गणेश मंडळांना मूर्ती सुपूर्द करावी लागणार. मंडळाच्या कार्यकर्त्यांना थेट मूर्ती विसर्जन करता येणार नाही.
मोठ्या गणेश मंडळांची मागणी होती की, कृत्रीम तलावांच्या ठिकाणी विसर्जन करणं कठीण जात असल्यानं आम्हाला चौपाट्यांवर किंवा नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची परवानगी देण्यात यावी, ही मागणी बैठकीत मान्य करण्यात आली आहे.
गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यावी का याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन वरीष्ठ पातळीवर घेण्यात येणार