मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत. तर, दौऱ्याच्या आढावा घेण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjau Raut) सोमवारपासून अयोध्येत तळ ठोकून आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत.
आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर जात असून त्याआधीच शिवसेना नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं विशेष गाड्या करून अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत पोहचलेल्या शिवसेना नेत्यांमध्ये खासदार संजय राऊत यांच्यासह उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, आमदार यामिनी जाधव, शिवसेना उपनेते यशवंत जाधव आदी नेते दाखल झाले आहेत. तर, हा दौरा राजकीय नसल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.
दरम्यान, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचं मात्र अयोध्येत स्वागत केलं जाणार आहे. या दौऱ्याच्या वेळी आदित्या ठाकरे हनुमान गढीचं दर्शन घेणार असून प्रभू श्री रामाचं दर्शन करणार आहेत. संध्याकाळी 6.45 वाजता शरयू नदीच्या घाटावर आरती करणार आहेत.