Aaditya Thackeray: बांगलादेश क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंची टीका
बांगलादेशाची क्रिकेट टीम कसोटी आणि T20 मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर आली आहे. चेन्नईत 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. मात्र या मालिकेपूर्वी मोठं राजकारण पेटलं आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टीका केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी भारत-बांगलादेश मालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
आदित्य ठाकरे ट्विट करत म्हणाले की, बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे... BCCI नेच त्यांना पायघड्या घातल्यात!
आता मी पराराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की, काही माध्यमं आणि सोशल मिडियात सातत्याने सांगितलं जात असल्याप्रमाणे गेल्या २ महिन्यात बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का?
जर खऱ्या असतील, तर हिंदूंवर बांगलादेशात अन्याय होत असताना त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्याच्या निर्णयामागे केंद्र सरकार वर कोणाचा दबाव आहे?
आणि जर ह्या बातम्या खोट्या असतील तर, सोशल मिडियातून आणि माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या ह्या बातम्या (बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार!) हा भाजपाने भारतातल्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला 'जुमला' तर नाही ना?
हिंदूवर जर बांगलादेशात खरंच अत्याचार होत असतील, तर भाजपा प्रणित केंद्र सरकार त्यांच्याच क्रिकेट संघाला पायघड्या का घालतंय?
कुठे गेलं ह्यांचं हिंदुत्व?
की त्यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांसाठीच असतं?
कसोटी मालिकेसाठी भारत आणि बांगलादेश संघ
टीम भारत:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
टीम बांगलादेश:
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, झाकीर अली, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, महमुदुल हसन जॉय, नईम हसन, खालिद अहमद