५० वर्षांवरील झाडं ‘हेरिटेज वृक्ष’, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा
राज्यात 50 वर्षांपुढे जगणाऱ्या झाडांना हेरिटेज वृक्ष म्हणून ओळखलं जाणार असल्याचं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. यापुढे 200 हून अधिक झाडे कापण्यासाठी एक्स्पर्टची कमिटी देखील तयार करणार असल्याचे पर्यावरण मंत्र्यांनी सांगितले.
हेरिटेज ट्री संकल्पना
राज्याच्या नागरी भागात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री असे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात येईल. 'हेरिटेज ट्री' ही संकल्पना आणि त्यांच्या संरक्षणासाठीचा आवश्यक कृतीकार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
या सुधारणांमध्ये 'हेरिटेज ट्री' ही संकल्पना आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी, वृक्षाचे वय, भरपाई वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होणारी वृक्ष तोड, महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना, स्थानिक वृक्ष प्राधिकरणाची रचना, कर्तव्ये निश्चित करणे, वृक्ष गणना करणे, वृक्ष लागवडीसाठी सामुहिक जमीन निश्चित करणे, वृक्षांचे पुनर्रोपण वृक्ष संरक्षणासाठी पर्यायी विकल्पांचा शोध, वृक्ष उपकर आणि दंडाच्या तरतूद या ठळक बाबींचा समावेश आहे.