मुंबईत मराठी पाट्यांसाठीची कारवाई मंदावली; आतापर्यंत 80 टक्क्यांच्यावर दुकानदारांकडून नियमाची अंमलबजावणी
मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या नसल्याने पालिकेने जोरदार कारवाई सुरू केली होती. आता मात्र ही कारवाई काहीशी मंदावल्याचे दिसते. मराठी पाट्या न लावणाऱ्यांवरील कारवाई सुरूच असून आतापार्यंत 80 टक्क्यांच्यावर दुकानदारांनी नियमाची अंमलबजवणी केल्याचा दावा पालिका प्रशासन करत आहे.
विविध आस्थापना आणि दुकानांना भेटी देण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. नियमांचे उल्लंघन केलेल्यांवर पालिका जरी कारवाई करत असली, तरी कारवाईचा वेग आणि जरब कमी झाली आहे. यामुळे मुंबईतील काही भागांत अद्यापही मराठी पाट्या बसवून घेण्याचा वेग मंदावला असल्याचे दिसते. व्यापाऱ्यांच्या संघटनांनीही मराठी पाट्या लावण्याचे आवाहन वारंवार केले आहे. काही दुकानदारांकडून त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, मंगळवारी एकूण 2780 दुकाने आणि आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. यातील 2688 आस्थापना आणि दुकानदारांनी नियमांचे पालन केल्याचे आढळले; तर 92 जणांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले असून त्यांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मुंबई आणि उपनगरात सुमारे सात लाख दुकाने आस्थापना आहेत. त्यापैकी सुमारे 80 टक्के दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावल्या असून उर्वरित दुकांनावर मराठी पाठ्या लावणे अद्याप बाकी आहे. पालिका प्रशासनाने आतापार्यंत एकूण 48,000 दुकाने आणि अस्थापनांना भेटी दिल्या असून त्यातील 45,911 जणांनी नियमांची अंमलबजावणी केली आहे, तर आतापर्यंत फक्त 2089 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.