पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
अनिल ठाकरे | चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या अनिल गणपत मडावी (वय- 29 वर्ष) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची करण्यात यावी, अशी मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे.
अनिल गणपत मडावी हा विरुर येथील रहिवाशी असून, सोमवारी 12 रोजी दुपारच्या सुमारास विरूर स्थानकातून सुमारे पंचवीस हजारांच्या तांबे केबल चोरीच्या प्रकरणात त्याला अटक करून चौकशीसाठी बल्लारपूर आरपीएफच्या साऊथ रेल्वे चौकी येथे आणण्यात आले. रात्री 8 च्या सुमारास हातावर जखम झाल्यामुळे तो बेशुद्ध झाला म्हणून उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याचे पाहता त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रात्री 10 च्या सुमारास या आरोपीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहेत.
या प्रकरणात आता हा घातपात तर नाही ना, असा संशय व्यक्त करीत कुटुंबीयांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.