आषाढी वारी करून परतताना गाडीला भीषण अपघात; 10 वारकरी जखमी

आषाढी वारी करून परतताना गाडीला भीषण अपघात; 10 वारकरी जखमी

Sangali : टेम्पो पलटी झाल्याने घडला अपघात
Published on

संजय देसाई | सांगली - आषाढी वारी करून परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दहा वारकरी जखमी झाले आहेत. तासगाव तालुक्यातल्या मनेराजुरी या ठिकाणी हा अपघात घडला आहे. जखमींना तातडीने सांगली आणि मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भागाईवाडी व परिसरातील 60 वारकरी हे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर या ठिकाणी गेले होते. आषाढी वारी संपल्यानंतर पुन्हा गावी परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. एका टेम्पोमधून हे सर्व वारकरी पंढरपूर येथून सकाळी निघाले. दरम्यान, दुपारी तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथील पावर वस्तीजवळ पोहचले असता वळण घेताना टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यानंतर टेम्पो रस्त्याकडेला पलटी झाला. यामध्ये दहा ते बारा वारकरी जखमी झाले आहेत.

यामध्ये वयस्कर महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. घटनास्थळी तातडीने ग्रामस्थांनी धाव घेतली असून रुग्णवाहिका आणि इतर वाहनातून जखमी वारकऱ्यांना सांगली, मिरज आणि तासगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकऱ्यांच्या दिंडीत जीप घुसल्याने अपघात घडला होता. यामध्ये 17 वारकरी गंभीर जखमी झाले होते. त्यापाठोपाठ आणखी एका वारकऱ्यांच्या दिंडीला परतत असताना अपघात झाला आहे. मात्र, सुदैवाने या दोन्ही अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची आतापर्यंत जीवित हानी झालेली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com