गरज पडल्यास कर्ज काढू, पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करू – अब्दुल सत्तार
प्रशांत जव्हेरी, नंदुरबार | मराठवाड्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. असंख्य शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात आता शिवसेनेचे नंदुरबार संपर्कमंत्री व राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठे विधान केले आहे. नंदुरबारमध्ये ते बोलत होते.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज कोपरली, कोळदा व भालेर येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभा घेतल्या. कोपर्ली गटातील राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रचार सभेदरम्यान त्यांनी उपस्थितांना संबोधित करून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे मतदारांना आव्हान केले.
महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत मिळावी याबद्दल विचारले असता त्यांनी शासनाच्या नियमानुसारच शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार प्रयत्नशील आहे त्यांनी तसे आदेश दिले असून गरज पडल्यास शासन कर्ज काढून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल. पुढील चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांना ईडीच्या नोटीस बद्दल विचारले असता त्यांनी ईडीची नोटीस म्हणजे पोलिस स्टेशन मधील एन सी प्रमाणे झाले आहे त्यामुळे केंद्र सरकारने ईडीचा दुरुपयोग करु नये अशी विनंती केली आहे.