महामार्गावरील खड्डयांमुळे महिलेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

महामार्गावरील खड्डयांमुळे महिलेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीच्या अपघातात मरण पावलेल्या पूजा गुप्ता या महिलेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

संदीप गायकवाड | वसई |महामार्गावरील खड्डयांमुळे महिलेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीच्या अपघातात मरण पावलेल्या पूजा गुप्ता या महिलेच्या मृत्यूप्रकरणी नायगाव पोलिसांनी महामार्गाचे ठेकेदार आणि कंपनीविरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ९ ऑगस्ट रोजी महामार्गावरील बापाणे येथे हा अपघात घडला होता.

मालाड येथे पूजा गुप्ता (२७) ही विवाहित महिला पतीसोबत राहत होती. बुधवार, ९ ऑगस्ट वसईत राहणाऱ्या मामेबहिणीच्या वाढदिवसासाठी पूजा तिचा दीर दीपक गुप्ता (२४) याच्या दुचाकीवरून वसईच्या वालीव येथे जाण्यासाठी निघाली होती. रात्री ९ च्या सुमारास बापाणे पुलावरून दुचाकी खाली उतरत असताना मध्येच असलेल्या खड्डयात त्यांची दुचाकी आदळली. या वेळी मागे बसलेली पूजा खाली पडली आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. १० दिवसांच्या उपचारादरम्यान पूजाचा मृत्यू झाला तक्रारीवरून नायगाव पोलिसांनी महामार्ग दुरुस्ती आणि व्यवस्थापनाचे काम करणारे ठेकेदार आणि कंपनीच्या मालकाविरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपासात पूजा गुप्ता हिचा मृत्यू खड्डयात पडून झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे संबंधित ठेकेदार आणि कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र पाटील यांनी दिली. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com