मोठागाव पूल ते गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या कामासाठी 661.36 कोटीची मान्यता
सूरेश काटे | कल्याण, डोंबिवली ते थेट टिटवाळा पर्यंतच्या कल्याण बाह्यवळण या महत्वाकांक्षी प्रकल्पातील मोठागाव पूल ते गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी 661.36 कोटी रूपयांच्या अंदाजपत्रकीय किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 16 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या एमएमआरडीएच्या 151 व्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या तिसऱ्या टप्प्यात मोठागाव पूल ते गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी 661.36 कोटी रूपयांच्या अंदाजपत्रकीय किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मोठागाव – माणकोली पूल आणि जोडरस्त्याना आवश्यक असलेली रस्ता संलग्नता उपलब्ध होणार आहे. तसेच कल्याण बाह्यवळण रस्त्याच्या भाग 4 ते 7 ची उपयोगिता वाढणार आहे. सध्याच्या घडीला मुंबई, ठाणे किंवा नाशिकहून कल्याण डोंबिवलीकडे येजा करण्यासाठी शिळफाटा मार्ग किंवा कोन गाव मार्गे दुर्गाडी पूल असा मोठा वळसा मारावा लागतो. या तिसऱ्या भागातील रस्त्याच्या उभारणीनंतर सुमारे एक तासाची बचत होऊ शकते, अशी माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
असा होणार प्रकल्प
या कामाच्या अंमलबजावणीसाठी आता प्रकल्प सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. त्यानंतर बांधकाम कंत्राटदाराची नेमणूक केली जाणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत या रस्त्यासाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. तर रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी महाराष्ट्र रेल इंफ्रास्ट्रक्चर डेव्लहेलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फ भुयारी मार्ग बांधले जाणार आहेत. या कल्याण बाह्यवळण रस्त्याच्या भाग तीनच्या बांधकामाची अंदाजित किंमत 661.36 कोटी आहे.
असा आहे टप्पा तीन
कल्याण बाह्यवळण रस्त्यातील टप्पा तीनची लांबी एकूण 5.86 किलोमीटर आणि रूंदी 45 मीटर इतकी आहे. यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पर्जन जलवाहिन्या, पदपथ, चारपदरी मार्गिका, आवश्यक 9 मोऱ्या, 4 लहान पूल, पथदिवे,दिवा वसई रेल्वेमार्ग ओलांडणारा मार्ग या कामांचा समावेश आहे. या रस्त्यातील भाग चार ते सात या टप्प्यातील सुमारे 16.40 किलोमीटर रस्त्याच्या उभारणीचे काम जागेच्या उपलब्धतेनुसार हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याचे सुमारे75 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.