बारावीच्या उत्तर पत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर? 'त्या' 372 विद्यार्थ्यांचा निकाल काय लागला
सचिन बडे | छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या 372 विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेवरील दोन वेगवेगळ्या हस्ताक्षराप्रकरणी शिक्षण मंडळाने नेमलेल्या चौकशी समितीने प्रथमदर्शनी मुलं दोषी नसल्याचे सांगितले आहे. या 372 विद्यार्थ्यांचा निकालही आज अखेर जाहीर केला आहे. याप्रकरणी बोर्डाकडून सोयगाव तालुक्यातल्या फरदापुर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली असून इतर दोषींवर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
बारावीच्या 372 उत्तर पत्रिकात एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. उत्तर पत्रिकांच्या या घोळामुळे परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी 15 मे नंतर बोर्डासमोर केंद्रप्रमुख, केंद्रसंचालक, कस्टडियन, प्रवेक्षक, मॉडरेटर आदींची चौकशी झाली. दरम्यान, या काळात सदर उत्तर पत्रिकेमध्ये दुसरे हस्ताक्षर आपलं नसल्याचं विद्यार्थ्यांनी लेखी उत्तर बोर्डाकडे सादर केला होता. सदर उत्तरपत्रिका सोयगाव तालुक्यातील दोन शिक्षकांकडे गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल होईल, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आता पोलीस तपासातच हे दुसरे हस्ताक्षर कोणाचे? यात काही आर्थिक व्यवहार झालेत का? यात प्रामुख्याने कोणती संस्था कोणते शिक्षक अथवा अधिकारी गुंतलेत का? संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.