नवीन वर्षांच्या पहिल्याच रात्री मालकाला कामगाराचा हिसका; 3 कोटींचे सोने घेऊन पसार
चंद्रशेखर भांगे | पुणे : नवीन वर्षाचं सर्वत्र स्वागत होत असतानाच एका सराफ व्यावसायिकाला त्याच्या कामगाराने हिसका दाखवला आहे. तब्बल ३ कोटी ३२ लाख ९ हजार २२८ रुपयांचे ५ किलो ३२३ ग्राम सोन्याचे दागिने आणि १० लाख ९३ हजार २६० रुपयांची रोकड कामगाराने लंपास केली. ही घटना १ जानेवारी रोजी पहाटे तीन वाजता रविवार पेठेतील राज कास्टिंग या दुकानात घडली. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दीपक नेताजी माने यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने यांचा सराफ व्यवसाय आहे. त्यांचा धायरी येथे सोन्याचे दागिने घडविण्याचा कारखाना आहे. याठिकाणी दागिने घडवून ते रविवार पेठेतील दुकानात तिजोरीत ठेवत असतात. ते शहरातील विविध सराफ व्यावसायिकांनी दिलेल्या ऑर्डरनुसार दागिने देखील तयार करून देतात. पुण्यामध्ये मागील सात वर्षांपासून त्यांचा व्यवसाय सुरू आहे. त्यांच्याकडे आजवर अनेक कामागारांनी काम केले आहे. सध्या त्यांच्याकडे चार कामगार काम करतात.
सध्या काम करीत असलेल्या किंवा यापूर्वी काम केलेल्या कामागारांपैकी कोणीतरी त्यांच्या दुकानाची आणि तिजोरीची बनावट चावी तयार करुन घेतली. त्याचा वापर करून दरवाजा उघडला. दुकानातील तिजोरी बनावट चावीच्या सहाय्याने उघडून ३ कोटी ३२ लाख ९ हजार २२८ रुपयांचे ५ किलो ३२३ ग्रॅम दागिने आणि १० लाख ९३ हजार २६० रुपयांची रोकड चोरून नेली. सकाळी दुकान उघडण्याकरिता आलेल्या माने यांना तिजोरीमधील दागिने गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक वैभव गायकवाड करीत आहेत.