Maharashtra HSC Result 2021 : बारावीचा निकाल जाहीर; असा पाहा तुमचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा यंदाचा निकाल हा ९९.६३ टक्के लागला आहे. दरम्यान चार वाजेनंतर वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहेत. बातमीच्या खाली दिलेल्या वेबसाईटवर आपल्याला निकाल पाहता येणार आहे.
सर्व विभागीय मंडळातून विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल हा ९९.८१ टक्के लागला आहे. हा निकाल इतर विभागापेक्षा सर्वाधिक आहे. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल हा ९९.३४ टक्के लागला आहे. तर यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून विद्यार्थीनींचा निकाल ९९.७३ टक्के लागला आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल हा ९९.५४ टक्के लागला आहे. विद्यार्थींनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.१९ टक्क्यांनी अधिक आहे.
तक्रारीसाठी
अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केलेल्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांच्या निराकरणासाठी मंडळाच्या स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या अनुषंगाने राज्य मंडळाने विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय मंडळाच्या स्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी टपाल, ई मेल किंवा व्यक्तिश: तक्रार नोंदवता येईल.