नंदुरबारमध्ये १६ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत मृत्यू; निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे मृत्यू झाल्याचा कुटूंबियांचा आरोप

नंदुरबारमध्ये १६ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत मृत्यू; निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे मृत्यू झाल्याचा कुटूंबियांचा आरोप

Published by :
Published on

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार | नंदुरबार जिल्ह्यात दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थ्यांचा आश्रम शाळेमध्ये मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेत शाळा प्रशासनाने या विद्यार्थ्यांचा मृत्यू व्यायाम करत असताना झाला असे स्पष्ट केले होते. तर शाळेमध्ये दिले जाणारे जेवण कोणत्या दर्जाचे आहे यावर कुटूंबियांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाद्वारे तळोदा आणि नंदुरबार अशा दोन प्रकल्पांच्या माध्यमातून आश्रम शाळा चालविल्या जातात. पुराना काळानंतर आठवी ते बारावी वर्ग सुरू असून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची जवळपास 70 टक्के हजेरी आहे. भाऊ कोरज्या गावीत राहणार भोवरे तालुका नवापूर वय सोळा वर्षे धनराट आश्रम शाळेमध्ये दहावीचे शिक्षण घेत होता. खेळाडू वृत्तीचा असलेल्या या विद्यार्थ्याचा शाळेच्या आवारात मृतदेह आढळून आला. त्यानंतर शाळा प्रशासनाने या विद्यार्थ्यांचा मृत्यू व्यायाम करत असताना झाला असे स्पष्ट केले होते. अवघ्या सोळा वर्षाच्या मुलाचा दम लागून मृत्यू होत असेल तर शाळेमध्ये दिले जाणारे जेवण कोणत्या दर्जाचे आहे यावर प्रश्न उपस्थित होतो.

सदर विद्यार्थ्यांची आई-वडिलांच्या माहितीनुसार शाळेत दिले जाणारे जेवण मुलाला आवडत नव्हतं.' मला रोज घरून डबा पाठवा' असं सांगितलं होतं. परंतु त्यांच्या परिस्थितीनुसार ते शक्य नसल्याने ते करू शकले नाही आणि मुलाचा जीव गमावावा लागला. सेंट्रल किचनच्या माध्यमातून दिले जाणारे अन्न निकृष्ट दर्जाचे आहे. हे वारंवार स्पष्ट झाले आहे. याबाबत विद्यार्थ्यांनीही दुजोरा दिला आहे. परंतु प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. नंदुरबार येथून मशीनमध्ये बनवून 50 ते 60 किलोमीटर लांब असलेल्या शाळांवर पोहोचेपर्यंत अन्नाचा दर्जा खालावतो. शीळ आणि थंड अन्न विद्यार्थ्यांना खावं लागतं. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर मोठा परिणाम होत आहे. या आधीही सेंट्रल किचनच्या अन्नामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडणे व मृत्यूचे प्रकार घडलेले आहे. त्यामुळे ही योजना बंद करावी अशी मागणी वारंवार केली आहे. परंतु आदिवासी विकास विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.

नंदुरबार येथील सेंट्रल किचनमध्ये याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गेले असता या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन दार बंद केलं. तसेच या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाबाबत विचारपूस करण्यासाठी देखील मनाई केली. शाळा प्रशासन विद्यार्थ्यांना दबाव टाकून बोलू देत नसलं तरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून हे स्पष्ट होतं की त्यांना दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे आहे. जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरुन शिक्षण घेण्यासाठी आश्रमशाळांमध्ये येणाऱे विद्यार्थी घरी चुलीवर बनवलेले जेवण खाण्याची सवय आहे. आश्रम शाळेत आल्यावर त्यांना मशीनमध्ये बनवलेलं जेवण दिले जात असल्याने चांगल्या दर्जाच्या जेवणाबाबत खंत व्यक्त केली जात आहे.

याबाबत आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना विचारले असता विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. सेंट्रल किचन मधून दिले जाणारे अन्ना बाबत विशेष कमिटी नेमून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com