पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची घोषणा; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटीचे पॅकेज महाविकास आघाडी सरकारने आज घोषित केले. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी या संदर्भात माहिती दिली. दरम्यान 4 हजार कुटुंबाच्या बँकेची माहिती सरकारकडे असून या व्यक्तीच्या खात्यात उद्यापासून रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला सानुग्रह अनुदान म्हणून 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यता आला आहे. दुकानदारांना 50 हजार आणि टपरीसाठी 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्ण घर पडलं असेल तर 1 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
पूरग्रस्त भागात 4 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच ग्रामीण भागातील शाळा, रस्ते, महावितरणाचेही नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील शाळा रस्ते यांचा यामध्ये समावेश आहे. अद्याप पंचनामे पूर्ण झाले नसून पूर्ण पंचनामे होण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा वेळ लागणार आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पैशांचे वाटप सुरू आहे. दरम्यान 4 हजार कुटुंबाच्या बँकेची माहिती सरकारकडे असून या व्यक्तीच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे.खरडून गेलेली जमीन 30 हजार हेक्टर आहे त्यात अधिकचे पैसे टाकून राज्य सरकार मदत करणार आहे.