Omicron Variant : महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 10 रुग्ण
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रॉन विषाणू आता महाराष्ट्रात फैलताना दिसत आहे. डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर आता मुंबईतही ओमिक्रॉनची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 10 वर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह राज्य सरकारची चिंता वाढली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एकाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं रविवारी सायंकाळी स्पष्ट झालं. राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 8 झाली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग सुरू होताचं पुणे महापालिका पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं सीओईपीच्या मैदानावरील जम्बो रुग्णालयाची पाहणी करत रुग्णालय कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जम्बो रुग्णालय 1 जानेवारीपर्यंत न हलवण्याच्या सूचना अजित पवारांनी बैठकीत दिल्या होत्या.
ओमिक्रॉनचा धोका वाढत असल्यामुळे टास्क फोर्सची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत टास्क फोर्समधील प्रमुख डॉक्टर सहभागी झाले आहेत. तसंच राज्यातील आणि देशातील ओमिक्रॉनच्या शिरकावानंतर सर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जात आहे.