...तर माझी फासावर लटकवण्याची तयारी; कुस्तीपटूंच्या आरोपांवर ब्रिजभूषण सिंगांचे विधान
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी गंगा नदीत पदके विसर्जित करण्याचा निर्धार केला होता. परंतु, शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंची समजूत काढली व त्यांनी माघार घेतली. या पार्श्वभूमीवर ब्रिजभूषण सिंग यांनी आज पलटवार केला आहे. आपण सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. एकही आरोप खरा ठरला तर फासावर लटकवण्याचीही तयारी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
ब्रिजभूषण सिंग म्हणाले की, माझ्यावर एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वतःच फाशी घेईन. आजही मी त्याच मुद्द्यावर ठाम आहे. 4 महिने झाले त्यांना माझी फाशी हवी आहे पण सरकार मला फाशी देत नाही म्हणून ते (कुस्तीपटू) त्यांची पदके गंगेत विसर्जित करत आहेत. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनो गंगेत पदक विसर्जित केल्याने ब्रिजभूषणला फाशी होणार नाही. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात द्या आणि कोर्टाने मला फासावर लटकवले तर मला ते मान्य आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनावर मोर्चा काढला होता. यावर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते. तर, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरून कुस्तीपटूंचा तंबूही हटवला होता.