World Women’s Day Special: मनोरंजन क्षेत्रात ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळस्थान निर्माण करणारी अभिनेत्री – उषा जाधव
तिचा जन्म कोल्हापुरातील रांगड्या मातीमध्ये झाला. वडील शिक्षक, मध्यमवर्गीय परिवार पण शाळेपासूनच तिला कला क्षेत्राची ओढ. आपण याच क्षेत्रामध्ये पुढे काम करायचं, हे तिने मनोमन ठरवलेलं होतं. पुढे ती पुण्याला आली, एका खासगी कंपनीमध्ये कामालाही लागली. पण तिच्या मनातून आपल्याला अभिनेत्री व्हायचं आहे, ही गोष्ट काही केल्या जात नव्हती. याच ओढीने अभियांत्रीकीचे शिक्षण सोडून ती मुंबईला आली. स्वत:चा खर्च भागवण्यासाठी तिनं इथे नोकरी केली. पण ही नोकरी तिला तिच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जात होती. तिचं कार्यालय फेमस स्टुडिओच्या समोर असल्याने आपणही काहीतरीे कामासाठी तिथं जायचं, हे तिनं ठरवलं होतं. एकेदिवशी अशीच ती एका ऑडिशनसाठी तिथे गेली असता तिला ट्राफिक सिग्नल या सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मात्र तिनं मागे वळून कधी पाहिलंच नाही. ट्राफिक सिग्नल, थँक्स मा, दो पैसे कि धूप, स्ट्रीकर, अशोक चक्र, धग, भूतनाथ, लखनौ टाइम्स, वीरपन्न असे दर्जेदार वास्तववादी चित्रपटांची पर्वणी तिने प्रेक्षकांना दिली. त्याचप्रमाणे सोल्ट ब्रिज नावाचा एक ऑस्ट्रेलियन चित्रपटामध्ये सुद्धा तिने काम केले आहे. तिच्या याच प्रवासात बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची तिला संधी मिळाली. त्याचवेळी खऱ्या अर्थाने मनोरंजन क्षेत्रात तिने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. धग या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. मानाचे मानले जाणारे "वोग"(vogue) या मासिकाच्या मुखपृष्ठावर तिने स्थान मिळवले. मनोरंजन क्षेत्रात ध्रुवताऱ्याप्रमाणे आपले अढळ स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री म्हणजे उषा जाधव.