अनंत चतुर्दशीला का केले जाते बाप्पाचे विसर्जन? जाणून घ्या महत्त्व
कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. . १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन करतात. पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनंती करत अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जातो. अनंत चतुर्दशी ९ सप्टेंबर शुक्रवारी आली आहे. मात्र बाप्पाचं विसर्जन अनंत चतुदर्शीलाच का केले जाते. चला तर मग जाणून घेऊया
हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्याच्या चौदाव्या दिवशी अनंत चतुर्दशी येते. या दिवशी १० दिवसांचा गणेशोत्सव संपतो, म्हणुन या दिवसाला अनंत चतुर्दशी म्हटले जाते. चतुर म्हणजे चार आणि दशी म्हणजे दहा.
गणपती बाप्पाने महाभारत ग्रंथ लिहला आहे. असे म्हटले जाते की, ऋषी वेद व्यासांनी महाभारत आत्मसात केले होते परंतु ते हा ग्रंथ लिहण्यास असमर्थ होते. हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना अखंड ग्रंथ लिहू शकणाऱ्या दिव्यआत्मा असणाऱ्या व्यक्तीची गरज होती. या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी ब्रह्म देवाला प्रार्थना केली. ब्रह्म देवाने सुचवले की, गणपती बुद्धीची देवता आहे ते हा ग्रंथ पुर्ण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील. ऋषी वेद व्यास यांनी गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली आणि त्यांनी त्याला होकार दिला. ऋषी वेद व्यासांनी चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताची कथा सांगण्यास सूरूवात केली आणि गणपती बाप्पा सतत लिहीत राहिले. दहाव्या दिवशी ऋषी वेद व्यासांनी डोळे उघडले. तेव्हा त्यांना दिसले की गणपती बाप्पाच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे. त्यांच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी, ऋषी वेद व्यास यांनी त्यांच्या शरीरावर मातीचा लेप लावला आणि तो लेप सुकल्यानंतर गणपती बाप्पाच्या शरीराला थंडावा मिळावा यासाठी त्यांना नदीत उडी मारायला लावली. तो दिवस अनंत चतुर्दशीचा दिवस होता. यामुळेच गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते, असे मानले जाते.