'जागतिक महिला दिन' ८ मार्चलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागची कारणे
दरवर्षी जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने ८ मार्च १९७५ ला महिला दिवस साजरा करण्याची सुरुवात केली होती. ८ मार्चचा हा खास दिवस महिलांना समान हक्क आणि सन्मान मिळण्यासाठी तसेच त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. परंतु, ८ मार्च हाच दिवस जागतिक महिला दिन म्हणून का साजरा करतात? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, मग जाणून घेऊयात यामागचं कारण.
संपूर्ण जगभरात महिलांनी विविध क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे. काबाडकष्ट करून आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडत महिलांनी अनेक क्षेत्रात यशाचं उंच शिखर गाठलं आहे. महिलांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, अशा उद्देशाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती आणि इतर क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानित केलं जातं. परंतु, ८ मार्चलाच वुमन्स डे सेलिब्रेशन का केलं जातं, जाणून घ्या.
८ मार्चलाच 'जागतिक महिला दिन' का साजरा करतात?
जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी ८ मार्च हा दिवस निवडण्यामागे एक खास कारण आहे. अमेरिकेत काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या अधिकारांसाठी ८ मार्चला आंदोलन केलं होतं. न्यूयॉर्कमध्ये १९०८ ला कामगारांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने हा दिवस निवडला होता. तर रशियाच्या महिलांनी महिला दिवस साजरा करताना पहिल्या महायुद्धाला विरोध केला होता. रशियाच्या महिलांनी 'ब्रेड एंड पीस'साठी १९१७ ला आंदोलन केलं होतं. युरोपमध्येही शांततापूर्ण वातावरणाची निर्मिती करण्यासाठी महिलांनी रॅली काढली होती. या कारणांमुळे ८ मार्च आंतराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
'महिला दिन' २०२४ ची थीम
दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिवस एका थीमच्या साहाय्याने साजरा केला जातो. वर्ष २०२४ मध्ये हा दिवस इन्स्पायर इन्क्लूजन (Inspire Inclusion) म्हणजेच एक असं जग, जिथे प्रत्येकाला समान हक्क आणि सन्मान मिळावा, या थीमने साजरा केला जाणार आहे.
जागतिक महिला दिनाचं महत्त्व
महिलांना पुरुषांप्रमाणेच समान हक्क आणि अधिकार मिळण्यासाठी या दिवसाचं विशेष महत्व असतं. महिलांमध्ये अधिकारांबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानेही हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. समाजात महिलांविषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी तसंच महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यसाठीही हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो.