Hanuman Jayanti 2024: अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान! कधी आहे हनुमान जयंती, कशी केली जाते साजरी? जाणून घ्या तिथी, मुहूर्त
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।
शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानाची जयंती गुरुवार, 23 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. हनुमानाला मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते. हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे. हनुमंताला मारूती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते. हनुमानाला तेल, शेंदुर, रूईची फुले, पाने अर्पण करण्याची परंपरा आहे. हनुमानाला महादेव शिवशंकाराचा अवतार मानले जाते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्या अंजनीलाही पायस मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता.
हिंदू पंचांगानुसार, हनुमान जयंती चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला येते. चैत्र पौर्णिमा तिथी 23 एप्रिल 2024 ला पहाटे 3:25 वाजेपासून 24 एप्रिल 2024 ला पहाटे 5:18 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार हनुमान जयंतीचा उत्साह 23 एप्रिल 2024 ला साजरा करण्यात येणार आहे.
हनुमान जयंती ही भगवान रामाचे परम भक्त आणि हिंदू महाकाव्य रामायणातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक अशा भगवान हनुमान यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. भगवान हनुमानाच्या जन्माचे मूळ प्रभू रामाच्या युगासह जोडलेले आहे. द्रिक पंचांगानुसार, असे मानले जाते की, भगवान हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला (मंगळवार) सूर्योदयानंतर झाला होता. त्यांचा जन्म चित्रा नक्षत्र आणि मेष लग्नाच्या वेळी झाला.
भगवान हनुमान हा महादेवाचा अवतार असून ते अष्टसिद्धी आणि नवनिधीचे दाता असल्याचे म्हटले जाते. ते शाश्वत ऊर्जा, निष्ठा आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात. भगवान हनुमानाची प्रार्थना एखाद्याच्या जीवनात सुसंवाद, सामर्थ्य आणि यश आणण्यास मदत करते. हनुमान जयंतीच्या पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी बजरंगबली त्याचे पूजन करणार्या व्यक्तीला सर्व रोग आणि दोषांपासून दूर ठेवतो आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून त्याचे रक्षण करतो. जीवनातील दु:ख दूर होऊन सुख-शांती प्राप्त होते. यासोबतच शनिदेवाची अशुभ स्थिती असलेल्या लोकांनी हनुमान जयंतीचे व्रत केल्यास शनीचे दोष दूर होऊन त्रासांपासून मुक्ती मिळते असेही मानतात.