Kargil Vijay Diwas: असा आहे कारगिल विजय दिवसाचा इतिहास; जाणून घ्या...
26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. आज 25वा कारगिल विजय दिवस आहे 'कारगिल विजय दिवस' हा भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी एक महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. कारगील हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून 205 किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. कारगीलमध्ये काश्मीरमधील इतर ठिकाणांसारखे हवामान आहे. उन्हाळा हा सौम्य कडक तर हिवाळा अतिशय कडक असतो व तापमान उणे 40 अंश सेल्सियस पर्यंतही उतरू शकते.
भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर कब्जा मिळवला. या युद्धात भारताचा विजय झाला. कारगिल विजय दिवस हा युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
1971 च्या भारत-पाक युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये अनेक सशस्त्र युद्धे झाली आहेत. 1998 मध्ये दोन्ही देशांनी अणुचाचण्या घेतल्या होत्या. लाहोर घोषणेने काश्मीर समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, ज्यावर दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999 मध्ये स्वाक्षरी देखील केली होती. पण पुढे नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. याच घुसघोरीला ऑपरेशन बदर असे नाव देण्यात आले होते.
कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मात्र ही गोष्ट मान्य करण्यास पाकिस्तानने नेहमीच नकार दिला आहे. पण नंतर अशी अनेक तथ्ये युद्धादरम्यान आणि युध्दानंतरही समोर आली आहेत, ज्यात सिद्ध झाले की पाकिस्तानी लष्कराने घुसखोरांना मदत केली होती. तेव्हा नवाझ शरीफ हे मदतीसाठी अमेरिकेच्या वॉशिंग्टनलाही गेले होते. मात्र त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला मदत करण्यास स्पष्ट नकार दिला होता.