Shravan Somvar Vrat 2021 ; श्रावणाचं महत्त्व, तिथी सर्व काही जाणून घ्या..
व्रत-वैकल्यांचा, सणावारांचा मानला जाणारा पवित्र श्रावण महिना आजपासून सुरू झाला आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, म्हणून या महिन्याला 'श्रावण' असे नाव मिळाले आहे. आज श्रावणातील पहिला सोमवार शिवभक्तांसाठी अत्यंत खास आहे.
श्रावण महिना आज 09 ऑगस्ट 2021 पासून सुरु होईल आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार असणार आहे. चला तर आज श्रावणाचं महत्त्व, तिथी आणि कुठल्या श्रावणी सोमवारी कुठली मूठ शिवाला अर्पण करावी? याबाबत जाणून घेऊयात…
असे आहे महत्त्व : भगवान शिवाला अत्यंत प्रिय महिना म्हणजे श्रावण. त्यामुळेच विशेषतः या काळात महादेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की, श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देखील देतात. तसेच भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्रित पूजा केल्याने सौभाग्य लाभते, आर्थिक समस्या दूर होतात.
महादेवांना मूठ अर्पण करण्याची परंपरा : नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. मूठभर तांदूळ आणि तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ असे एकेक दर सोमवारी शिवाला वाहतात. तर नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात.
श्रावण महिन्यातील 5 सोमवार खालीलप्रमाणे :
● पहिला श्रावणी सोमवार : 09 ऑगस्ट 2021
● दुसरा श्रावणी सोमवार : 16 ऑगस्ट 2021
● तिसरा श्रावणी सोमवार : 23 ऑगस्ट 2021
● चौथा श्रावणी सोमवार : 30 सप्टेंबर 2021
● पाचवा श्रावणी सोमवार : 06 सप्टेंबर 2021
शिवाला कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ वाहावी? :
● पहिला श्रावणी सोमवार : तांदूळ
● दुसरा श्रावणी सोमवार : तीळ
● तिसरा श्रावणी सोमवार : मूग
● चौथा श्रावणी सोमवार : जव
● पाचवा श्रावणी सोमवार : सातू