अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ
सतेज औंधकर, कोल्हापूर
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तीपूर्ण वातावरणामध्ये सुरुवात झालीय. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ असलेल्या अंबाबाई मंदिरामध्ये तोफेच्या सलामीने घटस्थापनेचा विधी पार पडला. नऊ दिवस अंबाबाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून नऊ दिवस विविध रूपांमध्ये अंबाबाईची पूजा मांडण्यात येणार आहे. दरम्यान यंदाचा नवरात्र उत्सव निर्बंध मुक्त असल्याने पंचवीस लाख भाविक येण्याचा अंदाज देवस्थान समितीने व्यक्त केला आहे तर पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केलेली पाहायला मिळाली.
कोल्हापूरचे अंबाबाईचे देऊळ हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, आणि महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे आणि सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते. कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात.
पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती आणि अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा. मांगल्य आणि आदिशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाला गुरूवारी घटस्थापनेने सुरूवात झाली. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने नवरात्रोत्सानिमित्त आयोजित केलेल्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचाही घट बसला. देवस्थान समितीच्यावतीने मंदिरात घटस्थापना करण्यात आली. यावेळी तोफेची सलामी देण्याची परंपरा आजही आहे.