अस्पृशांचा भाग्यविधाता गेला हो! बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर वृत्तपत्राचे शीर्षक
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 66 वा महापरिनिर्वाणदिन आहे. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी येत आहेत. मात्र, त्याकाळात कुठलेही माहितीचे साधणं नसताना एवढे लाखो लोक कसे बाबासाहेबांना शेवटचा निरोप देण्यासाठी आले. याबाबत आज आपण जाणून घेऊ.
6 डिसेंबर 1956 च्या सकाळी दिल्लीतल्या ‘26, अलिपूर रोड’ या निवासस्थानी बाबासाहेबांचं निधन झालं. बाबासाहेबांच्या निधनाच्या वार्ता देशासह जगभर वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र एकच हंबरडा फुटला. ‘26, अलिपूर रोड’ ते ‘चैत्यभूमी’ अशी बाबाबासाहेबांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यादरम्यान कोणत्या विशेष घटना घडल्या, ते जाणून घेणार आहोत.
त्यानुसार नानकचंद रट्टूंनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI), यूएनआय, आकाशवाणी केंद्र आणि सरकारी खात्यांना फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली. वणव्यासारखी ही वार्ता सर्वदूर पसरली आणि हजारो अनुयायी ’26, अलिपूर रोड’ या दिल्लीस्थित निवासस्थानाकडे येऊ लागले.
6 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 26, अलिपूर रोड निवासस्थानीच बाबासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर एका सजवलेल्या ट्रकवर पार्थिव ठेवून सफदरजंग विमानतळाच्या दिशेनं नेण्यात आलं. बाबासाहेबांचं पार्थिव घेऊन विमान दिल्लीहून मुंबईच्या दिशेनं रात्री साडेदहा वाजता निघालं. हे विमान नागपुरात थांबवण्यात आलं. तिथे बाबासाहेबांना वंदन करण्यात आलं आणि विमान मुंबईच्या दिशेनं उडालं. मुंबई सांताक्रूझ विमानतळावरून रात्री 2.25 वाजता रुग्णावाहिकेत पार्थिव ठेवून, रुग्णवाहिका राजगृहाच्या दिशेनं निघाली. चैत्यभूमीच्या ठिकाणी लाखो अनुयायी बाबाहेबांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी ना भूतो ना भावो अशी अनुयायांची गर्दी जमली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर 1956 वृत्तपत्रामध्ये बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या बातम्या प्रकाशित झाल्या. त्यावेळी 'मराठा' हे वृत्तपत्र प्रचलित होते. मुंबई वरून प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राचे संपादक आचार्य अत्रे होते. मराठा या वृत्तपत्राचे संपूर्ण पहिले पान हे बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाच्या बातम्यांनी भरले होते. हाय हाय सात कोटी अस्पृशांचा भाग्यविधाता गेला हो! असे वृत्तपत्राच्या वर लिहले होते. तर, हिंदू कॉलनीतील राजगृह निवासस्थानी 3 लाख अनुयायी उपस्थित होते अशी देखील माहिती प्रकाशित करण्यात आली होती. दलित समाज आज बाबांच्या परिनिर्वाणाने उघडा पडला.असे भावुक वाक्य त्या वृत्तपत्रामध्ये लिहले होते.