नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे सर्वात मोठे नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२७ वी जयंती आहे. संपूर्ण देश हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशात झाला. बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. सुभाषचंद्र बोस यांचे वडील जानकीनाथ बोस हे व्यवसायाने वकील होते आणि त्यांची आई गृहिणी होत्या. नेताजी यांचे प्राथमिक शिक्षण कटक येथील रेवेनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये झाले.
‘तुम मुझे खून दो, मै तुम्हें आजादी दुंगा’ असं ते आवाहन करत. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. नेताजी सुभाषचंद्र बोस लहानपणापासूनच भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित चळवळींमध्ये सहभागी होते. 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिनमध्ये आझाद हिंद रेडिओ आणि फ्री इंडिया सेंट्रलची स्थापना केली. 1943 मध्येच आझाद हिंद बँकेने 10 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंतची नाणी जारी केली. एक लाख रुपयांच्या नोटेत नेताजी सुभाषचंद्रांचे चित्र छापण्यात आले होते. महात्मा गांधींना सुभाषचंद्र बोस यांनी 'राष्ट्रपिता' असे संबोधले होते.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1920 मध्ये भारतीय नागरी सेवा परीक्षा दिली आणि चौथा क्रमांक मिळविला. त्यावेळी ही एक मोठी उपलब्धी होती, कारण ब्रिटीश राजवटीत भारतीयांना सामान्य परीक्षाही उत्तीर्ण होणे कठीण होते. भारतात आल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला, परंतु येथील भारतीयांची दयनीय अवस्था पाहून त्यांनी २३ एप्रिल १९२१ रोजी नोकरी सोडली आणि स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.