नवरात्री विशेष : मंचकी निद्रा संपवून आई तुळजाभवानी गर्भघरात दाखल
कोरोनाच्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्री मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून सुरु झाला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मध्यरात्री एक वाजता देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा संपवून आपल्या गर्भ घरात दाखल झाली. यावेळी आई तुळजाभवानीच्या मूर्तीला पंचामृताचा विधिवत महाभिषेक करण्यात आला. पहाटे चार वाजता तुळजाभवानीची मंदिर संस्थांचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. नऊ दिवसाच्या घोर निद्रेनंतर आई तुळजाभवानीचे दर्शन भाविकांना मिळते.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची गेली 9 दिवसापासून सुरु असलेली मंचकी निद्रा संपली असून पहाटे देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती सिंहासनावर स्थापित करण्यात आली. तुळजाभवानी देवी ही देशातील एकमेव चल मूर्ती आहे. शारदीय नवरात्र उत्सव आज दुपारी घटस्थापनेने सुरु होणार आहे. त्यापूर्वी देवीची मूर्ती विधिवत पूजा करुन पलंगावरून मूळ सिंहासनावर नेण्यात आली. देवीची मंचकी निद्रा ही वर्षातून 3 वेळेस असते.