Sankashti Chaturthi 2024: संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ
जुलै महिन्यामध्ये 24 जुलैला म्हणजेच उद्या संकष्टी चतुर्थी आहे. गणेशभक्तांसाठी दर महिन्यात येणारा हा चतुर्थीचा दिवस खास असतो. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्या चतुर्थीस 'संकष्ट चतुर्थी' किंवा 'संकष्टी चतुर्थी' म्हणतात. या दिवशी अनेकजण मनातील इच्छा पूर्ण होवोत या अपेक्षेने गणपती बाप्पाचे व्रत केले जाते. या व्रताची सांगता चंद्रोदयानंतर होत असल्याने अनेकांसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय वेळ खास असते. महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी आहे.
पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 24 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 जुलै रोजी पहाटे 04 वाजून 19 मिनिटांनी वाजता समाप्त होईल. 25 जुलै रोजी सूर्योदयापूर्वी चतुर्थी तिथी समाप्त होईल. त्यामुळे उदयतिथीनुसार, संकष्टी चतुर्थी बुधवार, 24 जुलै रोजी साजरी केली जाईल. कारण चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण मानले जात नाही. 24 जुलै रोजी रात्री 9:48 ही चंद्रोदयाची वेळ आहे.
चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करून गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर गणपती स्त्रोत्र पठण केले जाते. शेवटी लोकांना प्रसाद वाटप करून उपवास सोडला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकांसाठी शुभलाभदायक ठरू शकते, असे सांगितले जाते. तसेच गणपतीचा ‘ॐ गं गणपतये नम:’ हा मंत्र 108 वेळा किंवा जितका शक्य असेल, तितक्या वेळा म्हणावा, असे म्हटले जाते.