Jagannath Rath Yatra 2023 : जगन्नाथ रथयात्रा का काढली जाते? माहितीयं का?
Jagannath Rath Yatra 2023 : दरवर्षी 'जगन्नाथ रथयात्रा' थाटामाटात काढली जाते. या यात्रेत देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक सहभागी होण्यासाठी येतात. यावेळी भगवान जगन्नाथाची 146 वी रथयात्रा काढण्यात आली आहे. लाखोंचा जनसमुदाय ओडिशातील पुरी शहरात पोहोचला आहे. हे वैष्णव मंदिर श्री कृष्णाला समर्पित आहे. मंदिराच्या गर्भगृहात त्यांची वर्षभर पूजा केली जाते. मात्र, आषाढ महिन्यात तीन किलोमीटरच्या अलौकिक रथयात्रेतून गुंडीचा मंदिरात आणले जाते. जगन्नाथ रथयात्रा का काढली जाते आणि तिचे महत्त्व काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात अनेकदा येतो.
मान्यतेनुसार, भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा आषाढच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला आपल्या मावशीच्या घरी जातात. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातून तीन दिव्य रथांवरून ही रथयात्रा काढली जाते. बलभद्राचा रथ समोर असतो. बहीण सुभद्रा त्यांच्या मागे आणि जगन्नाथाचा रथ मागे असतो. यावर्षी जगन्नाथ यात्रा 20 जूनपासून सुरू होणार असून 1 जुलै रोजी संपणार आहे.
रथयात्रा का काढली जाते?
पद्म पुराणानुसार भगवान जगन्नाथाच्या बहिणीने एकदा हे शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा जगन्नाथ आणि बलभद्र यांनी त्यांची प्रिय बहीण सुभद्रा यांना शहर दाखवण्यासाठी रथावर सोडले. दरम्यान ते गुंडीचा येथे मावशीच्या घरीही गेले आणि येथे सात दिवस राहिले. तेव्हापासून जगन्नाथ यात्रा काढण्याची परंपरा सुरू आहे. नारद पुराण आणि ब्रह्म पुराणातही याचा उल्लेख आहे. मान्यतेनुसार, देव आपल्या मावशीच्या घरी आपल्या भावंडांसोबत आवडते पदार्थ खातात आणि मग ते आजारी पडतात आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जातात. त्यानंतरच ते लोकांना दर्शन देतात.