Children’s day 2021 : लहान मुलांना मूल म्हणून जगू देण्याची जाणीव देणारा ‘बालदिन’
लहान मुले काय शिकतात, यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात हे पालकांनी आणि शिक्षकांनी पाहिले पाहिजे. मुलांना देवाघरची फुले म्हटले जाते. ते फुलांप्रमाणे कोमल असतात. त्यांना प्रेमाने आणि काळजीने हाताळले पाहिजे. कारण या लहान मुलांमध्ये देशाचे भवितव्य दडलेले आहे. देशाची खरी शक्ती आणि समाज उभारणीचा पाया लहान मुले असतात. हे विचार आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यांना लहान मुले फार प्रिय होती. लहान मुलांनाही हे चाचा नेहरू आपलेसे वाटायचे. इंदिरा ह्या आपल्या मुलीवर नेहरुजींचे जीवापाड प्रेम होते.
पंडित नेहरू यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिवशी बालदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलांना लहान वयात चांगले मार्गदर्शन मिळाले, तरच ते भविष्यात सुजाण नागरिक होऊ शकतील, या उद्देशातून दरवर्षी बालदिनाच्या निमित्ताने योजना आखणे, कार्यक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे. मुलांच्या गरजा, त्यांचे हक्क याविषयी जागरुकता वाढावी, बाल कल्याणाच्या योजना कार्यक्षमतेने राबवणे तसेच मुलांमध्ये सामंजस्याची भावना वाढावी, बंधुभाव वाढावा या दृष्टीनेही प्रयत्न केले जातात.
पूर्व प्राथमिक शिक्षण हा लहान मुलांच्या जडणघडणीत सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरतो. त्याची जाण ठेवून अनुताई वाघ, ताराबाई मोडक, सानेगुरुजी, राजा मंगळवेढेकर, भा. रा. भागवत यांच्यासारख्या अनेकांनी मोलाचे योगदान दिले.
बाल आनंद मेळावा, बालमहोत्सव, बालदिन विशेष असे मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे करण्यापेक्षा मुलांना मानसिक- सामाजिक दृष्ट्या समृद्ध करणारे उपक्रम गरजेचे आहेत. वंचित- निराधार मुलांचाही विचार अशा वेळी व्हायला हवा.हुशारीच्या स्पर्धेत मुलांची दमछाक होते. त्यांना सतत दडपण येते, याचे भान ठेवायला हवे. मुलांना मूल म्हणून जगू द्यावे, याची जाणीव करून देण्यासाठीच हा बालदिन.