Gudi Padwa 2024: ...म्हणून गुढीपाडव्याला गुढी उभारली जाते?
गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सव आणि चैत्र नवरात्रला सुद्धा सुरवात होते. गुढीपाडवा हा एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.
गुढीपाडवा या सणाची आपण सर्वच जणं अगदी आतुरतेने वाट पाहात असतो. कारण यावेळी खमंग पुरणपोळ्या, श्रीखंड पुरी अशा साग्रसंगीत जेवणाची जय्यत तयारी असते. गुढीपाडव्याच्या मिरवणुकीतही अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आवर्जून सहभागी होतात. या दिवशी आपण दारात गुढी उभारतो आणि त्याची मनोभावे पूजा करतो.
म्हणून गुढीपाडवाला गुढी उभारली जाते
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. याच विजयाची आठवण म्हणून, गुढीपाडवाला गुढी उभारण्याची प्रथा आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते.
गुढी पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे नवीन वर्ष सुरू होत असते, गुढी पाडवाच्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी एक स्थिती असते. जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा प्रारंभ होत असला तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल म्हटले जाते की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे.