तुम्हाला दगडूशेठ हलवाई गणपतीची गोष्ट माहित आहे का? जाणून घ्या

तुम्हाला दगडूशेठ हलवाई गणपतीची गोष्ट माहित आहे का? जाणून घ्या

नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून दगडूशेठची ख्याती
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या बरोबरीने स्थान असणारा आणि ज्याची किर्ती संपूर्ण जगात पोहोचली आहे असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना कशी झाली? ती कोणी आणि कोणत्या उद्देशाने केली हे जाणून घेणे अतिशय रंजक आहे. नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. श्रीमंत असला तरीही तितकाच दानशूर म्हणूनही हा गणपती ओळखला जातो. अनेक सामाजिक संस्था आणि लोकांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे राहणारे मंडळ म्हणून दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ओळखले जाते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहायची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटमुळे ते स्वतः व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे दोघेही खचून गेले. त्यावेळी त्यांचे गुरू माधवनाथ महाराजांनी दगडूशेठ यांना आधार देत दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करुन त्याची पूजा करा, असे सांगितले. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या माता-पित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील, असेही ते म्हणाले होते.

महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मुर्ती बनवून घेतली. या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, सरदार परांजपे यांसारख्या अनेक नामवंत मंडळींची हजेरी होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात आजही आहे.

१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. तर १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दगडूशेठ हलवाई यांनी सुरु केलेली गणेशोत्सवाची परंपरा परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. सुवर्णयुग तरुण मंडळाने पुढे दगडूशेठच्या गणपतीची जबाबदारी घेतली. १८९६ मध्ये बनवलेल्या मुर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. मग नवीन मूर्ती बनवायची ठरवून १९६७ मध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त गणपतीची नवीन मुर्तीं बनविण्याचा संकल्प केला.

त्यानंतर १९६८ मध्ये सुवर्णयुग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार शिल्पी यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. मग ही मूर्ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठया मूर्तींचे काम करण्यात आले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर शिल्पी यांनी ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली. गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती, त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला. त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये ठेवले गेले. त्याकाळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च आलेला ११२५ रुपये आला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com