दावोस, कॉंक्रीट रस्ते, धनुष्यबाण कोणाचा अन्..., मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका
मुंबई : लोकशाही मराठी न्यूजची आज 3 वर्षांची गौरवपूर्ण वाटचाल पूर्ण केली असून चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहत लोकशाहीला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी दावोस दौरा, निवडणूक आयोगासारख्या राजकीय विषयांवर दिलखुलास चर्चा केली. तसेच, या माध्यमातून विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.
अवघ्या सहा महिन्यांमध्ये विभागाने केलेली कामे उल्लेखनीय आहे. दावोस दौऱ्यादरम्यान 1 लाख 37 हजाराचे सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे. आकडे वाढवण्यासाठी सामंजस्य करार केले नाहीत तर याचे प्रत्यक्षात रुपांतर होईल. यातून खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. सरकार बदलल्यानंतर आम्ही उद्योजकांना चांगल्या योजना, सुविधा, सबसिडी, सिंगल विंडो परमिशन दिल्या आहेत. तसेच, महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर, स्कील्स मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे उद्योजकांना रेड कार्पेट मिळाले आहे. केंद्र सरकारमध्ये समविचारी सरकार आहे. यामुळे पंतप्रधान मोदींचाही याला पाठिंबा आहेत. दावोसमध्ये जे सामजंस्य करार झालेत ते प्रत्यक्षात येतील. महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल. याचा राज्याला फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर चार्टर विमानाने जाऊनही उशिरा पोहचले. त्यामुळे महाराष्ट्रासाठीच्या बैठका रद्द झाल्या, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. यालाही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला दावोसला जाण्यास थोडा विलंब झाला. परंतु, या दोन दिवसांमध्ये 40 पेक्षा अधिक बैठका दावोसमध्ये पार पडल्या. मी राज्यात आल्यानंतरही उद्योगमंत्री व आमच्या टीमने बैठका घेतल्या. वातावरणीय बदलात महाराष्ट्राने जी काही भूमिका व काळजी घेतली आहे त्याबद्दल तेथे भूमिका मांडण्याची संधी मला तिकडे मिळाली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका शिंदे-फडणवीस सरकारने सुरु केला असल्याची टीकाही विरोधकांनी केली होती. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीच काम केले नाही आणि करणार नाही. समृध्दी महामार्ग जगातील सर्वात मोठा महामार्ग आहे. फडणवीसांच्या काळात त्यांनी संकल्पना मांडली. आम्ही त्यावर खूप काम केले. त्यावेळीही अनेकांनी विरोध केला. महामार्ग होऊच नये यासाठी खूप प्रयत्न केले, असा अप्रत्यक्ष निशाणा त्यांनी महाविकास आघाडीवर साधला आहे. पण, समृध्दी महामार्ग राज्याच्या दृष्टीने गेमचेंजर ठरेल. शेतकऱ्यांचा शेतमाल पाठवण्यासाठी 15-16 तासांचे होते. ते सहा-सात तासांवर आले आहे. पर्यावरणपूरक हा महामार्ग केला आहे. समृध्दी महामार्ग हा राज्याला आणि देशाला दिशा देणारा ठरणार आहे. आणखी काही प्रोजक्टवर काम सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
तर, कॉंक्रीटच्या रस्त्यावरुन आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत आहेत. यावरही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. मुंबईतील रस्त्यांना दरवर्षी खड्डे पडत होते. यावर दीर्घकाळ उपाय म्हणून क्रॉंक्रिटचे रस्ते आहे. मुंबई खड्डेमुक्त करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. आणि यामध्ये पर्यावरणाचा समतोल ढासळू नये यासाठी पूर्ण काळजी घेतली आहे. यामुळे कायमस्वरुपी मुंबईकरांचा खड्डेमुक्त प्रवास होईल. मग, आम्ही का करु नये, असा सवालच एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.
मुंबई सुशोभीकरण करण्यास कोणी थांबवले होते. मोहल्ला क्लिनिकची चर्चा होती. पण, करत कोणी नव्हते. आम्ही बाळासाहेब दवाखाना गल्लीगल्लीत उभा केला. 75-80 दवाखाने सध्या सुरु आहेत. मार्चपर्यंत 150 दवाखाने सुरु होतील. घराजवळ दवाखाना ही सर्वप्रथम ठाण्यामध्ये आम्ही मांडली. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना संकल्पना सांगितल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरवली. कोळीवाड्यांचेही विषय मार्गी लावत असून तेथील संस्कृती जोपासत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, 30 जानेवारी रोजी धनुष्यबाण कोणाचा हा यावर निवडणूक आयोगात महत्वपूर्ण सुनावणी आहे. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी या राज्यात व देशात लोकशाही आहे. आमचे सरकार लोकशाहीद्वारे स्थापन झालेले आहे. बहुमताचे सरकार आहे. नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे आमची बाजू भक्कम आहे. म्हणूनच विरोधक आरोप करत आहे. त्यांना ते करु द्या, असे म्हंटले आहे.