भाऊबीजेला भावाचं औक्षण करताना ताटात अवश्य ठेवा 'या' वस्तू
भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला (Diwali) सण म्हणजे भाऊबीज. यंदा भाऊबीजेचा सण आज 26 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. भाऊबीज हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा दिवाळीतला चौथा आणि शेवटचा दिवस असतो. भाऊबीज हा बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस.
ओवाळणीच्या ताटात काय काय असावं?
कुंकू - भावाच्या कपाळावर कुंकू लावून ओवाळणीला सुरूवात केली जाते. यामुळे रक्षण होतं असा समज आहे.
अक्षता- अक्षता म्हणजे तांदूळ. कोणत्याही शुभ कार्यात त्याचा अवश्य समावेश केला जातो.
कापूस आणि सोन्याची अंगठी - ओवाळणीच्या वेळेस भावाच्या डोक्यावर कापूस आणि अंगठी ठेवली जाते.
नारळ - नारळ अर्थात श्रीफळाला देखील ओवाळणीच्या ताटात महत्त्व आहे.
दिवा- तूपाचा किंवा तेलाचा दिवा/ निरंजन याने भावाचं औक्षण करण्याची प्रथा आहे.
गोडाचा पदार्थ - ओवाळणीची सांगता भावाला गोडाचा पदार्थ भरवून केली जाते.
भाऊबीजेला ओवाळताना प्रथम भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावा. त्यावर अक्षता लावा. कापूस आणि अंगठी भावाच्या डोक्यावर ठेवा. दिव्याचं ताट भावाच्या चेहऱ्यासमोर तीन वेळेस फिरवा. त्यानंतर गोडाचा पदार्थ भारावून भावाचा आशीर्वाद घ्या. ओवाळणी झाल्यानंतर बहीण - भाऊ एकमेकांना प्रेमाची वस्तू भेट म्हणून देतात.
भाऊबीज शुभ मुहूर्त आणि तिथी
हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला साजरे केले जाते. भाऊबीज 26 ऑक्टोबर रोजी असणार आहे. मात्र, भाऊबीज तिथी 2 वाजून 42 मिनिटांपासून सुरु असणार आहे. त्यामुळे भाऊबीज साजरा करण्याची वेळ दुपारी 1:18 ते 3.33 पर्यंत असणार आहे.
सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लोकशाही न्यूज मराठी पुष्टी करत नाही.