'किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून शाहू राजेंना चुकीची माहिती दिली'
मुंबई : काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून शाहू राजेंना (Shahu Raje) चुकीची माहिती दिली आहे. त्या लोकांना हे समजत नाही की त्यांच्या अशा वागण्यामुळे एका बाजूला ते छत्रपती संभाजीराजेंना (Sambhaji Raje) खोटे ठरवत आहेत. तर, दुसरीकडे शाहू राजे आणि संभाजी राजेंना यांच्यात काही अंतर आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shivsena) केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शाहू राजे आमचे छत्रपती आहे, त्या गादीचा एक मान आहे. त्यामुळे त्यांनी कुठलेही मत व्यक्त केले असले तरी त्यासंदर्भात मी बोलणार नाही. त्यासंदर्भात स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे.
मला एकाच गोष्टीचे दुःख आहे की काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून शाहू राजेंना चुकीची माहिती दिली आहे. त्या लोकांना हे समजत नाही की त्यांच्या अशा वागण्यामुळे एका बाजूला ते छत्रपती संभाजीराजेंना खोटे ठरवत आहेत. तर, दुसरीकडे शाहू राजे आणि संभाजी राजेंना यांच्यात काही अंतर आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे असं करत आहेत त्यांच्या अशा वागण्याबद्दल मला प्रचंड दुःख आहे, अशी भावना फडणवीसांनी व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, युवराज संभाजी राजे यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत होते. आणि सध्याही होत आहे. मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या प्रकारचे नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर त्याचे कोणतेही नुकसान भाजपला होत नाही. त्याचे नुकसान कोणाला होणार आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून संभाजी राजे यांचे नेतृत्व तयार होऊ नये या प्रकारचे प्रयत्न कोण करणार हे कोणाला राजकारण कळते त्याला समजू शकते, असा अप्रत्यक्ष टोला फडवीसांनी शिवसेनेला मारला आहे.
या ठिकाणी मी एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो की जेव्हा आभार मानण्याकरिता छत्रपती संभाजी राजे मला भेटले त्याआधीच त्यांनी घोषणा केली होती की ते कोणत्याही पक्षाचे तिकीट घेणार नाही. त्यांनी स्वतंत्र उभे राहणार, असे जाहीर करत आमच्याकडे अपक्ष म्हणून सर्व पक्षांनी (भाजप सह) पाठिंबा दिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मी त्यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला तर हायकमांडकडे सर्व माहिती देईन, असे आश्वासन दिले होते, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. काही लोक ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते नक्कीच उघडे पडतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, संभाजीराजे भोसले अपक्ष उभे राहण्यामागे भाजपची खेळी असल्याचा धक्कादायक खुलासा संभाजीराजेंचे वडील शाहू राजे यांनी केला होता. पक्ष घोषित करणं हा निर्णय चुकला, असेही त्यांनी म्हंटले होते.