Rohit Pawar| 'पालिका निवडणुकीत बृजभूषण मुंबईत प्रचाराला आले तर मनसेला आश्चर्य वाटू नये'
मुंबई : मनसे नेत्याने शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबतचा भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर या फोटोची चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी मनसे नेत्यावर ट्विटरद्वारे टीकास्त्र सोडले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) मोठे नेते. पण भाजप आपला वापर करून घेतंय हे मनसेला हे कसं कळत नसेल का, असा प्रश्न रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विचारला आहे.
रोहित पवार म्हणाले कि, राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण, भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये, असेही त्यांनी म्हंटले आहे.
मनसे नेत्यांनी व्हायरल केलेल्या फोटोवर रोहित पवार म्हणाले, राहिला प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा. तर पवार हे अनेक वर्षे 'महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे'चे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे 'कुस्ती संघा'चे अध्यक्ष आहेत. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळे संभाव्य अपघात टाळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल, अशी शंकादेखील त्यांनी उपस्थित केली आहे.
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या त्या फोटोवर टीका केली. तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राज ठाकरे यांच्याविरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे. तर फोटो जुना असल्याने शरद पवारांचे बृजभूषण यांच्याशी किती जुने संबंध आहेत हे कळते आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली होती.