राज ठाकरे हिंदुत्ववादी कधीपासून झाले? राऊतांचा प्रश्न
मुंबई : मराठी अस्मितेपासून हिंदुत्वावरपर्यंतचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या प्रवासाने राजकारण ढवळून निघाले आहे. राज ठाकरेंच्या प्रत्येक सभेप्रमाणे आजची पुण्यातील सभाही वादळी ठरली आहे. विरोधकांवर शरसंधान साधताना राज ठाकरेंनी प्रामुख्याने शिवसेनेला (Shivsena) लक्ष्य केले. याचा समाचार शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतला आहे.
शिवसेना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची क्रेडीबिलीटी घालवत आहे, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. यावर संजय राऊत म्हणाले कि, राज ठाकरे यांनी शिवसेनेवर बोलू नये. बाळासाहेबांची विश्वासार्हता काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्र, देश जाणून आहे. बाळासाहेबांची शिवसेना ५० वर्षांपासून काम करत आहे. राज ठाकरेंनी स्वतःविषयी बोलावे, स्वतःच्या पक्षाविषयी बोलावे. दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलू नये.
संभाजीनगरच्या नामांतरच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, औरंगाबादचं संभाजीनगर झालंच पाहिजे. ते आम्ही केलेलंच आहे, म्हणून राज ठाकरे संभाजीनगर बोलत आहेत, असे म्हणत ते पुढे म्हणाले, संभाजीनगर हा उच्चार जो त्यांनी केला आहे तो बाळासाहेबांमुळेच केला आहे. आता फक्त कागदोपत्री व्हायचं आहे. केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असून ते मंजूर करतील, अशी माहिती त्यांनी दिली.
राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतल्यापासून शिवसेना आणि मनसेमध्ये कोणाचे हिंदुत्व खरे, यावरुन आरोप-प्रत्यारोप होतात. आजही राज ठाकरेंनी आमचं हिंदुत्व खरं की खोटं सुरु आहे. हे काय वॉशिंग पावडर विकतायेत का? असा मिश्किल सवाल शिवसेनेला सभेत केला. तसेच, आमच्या हिंदुत्वाचा इफेक्ट लोकांना दिसतो, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. तर मनसे, राज ठाकरे कधी हिंदुत्ववादी झाले, असा थेट प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. आमच्या हिंदुत्वाला ढोंगी म्हणणाऱ्यांनी हिंदुत्वाची शाल कधी पांघरली त्याचा खुलासा करावा. आमचं हिंदुत्व हे प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्व आहे. आमच्या हिंदुत्वावरती कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. आमचं हिंदुत्व असंच तळपत राहील.
विधानसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु, संभाजीराजे यांना अद्याप शिवसेनेकडून राज्यसभा उमेदवारी जाहीर केलेली नाही. याबाबतचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे. दुसरा उमेदवार देखील शिवसेनेचा जाईल, हीच आमची भूमिका आहे. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. याशिवाय आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा १५ जूनला होणार असल्याचेही राऊतांनी सांगितले.