नवाब मलिकांचा राजीनामा घेऊनच आम्ही गप्प बसू- चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. याचदरम्यान आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाकडून आंदोलन करण्यात आले आहे. त्यावेळी सरकारला नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावाच लागेल. मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही. त्यांचा राजीनामा न घेण्याबाबत कुणाचा दबाव होता का? कदाचित मलिक यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून दाऊदचा दबाव असेल असा माझा अंदाज आहे, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी लगावला. नवाब मलीक यांचा राजीनामा घेऊनच आम्ही गप्प बसू् असे देखील चंद्रकांत पाटीलांकडून यावेळी सांगण्यात आले.
नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी आज मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. काहीही झाले तरी भाजपचा मोर्चा निघणारच. परवानगी मिळो अथवा न मिळो. मोर्चा काढणारच, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी आधीच म्हणालो होतो, काहीजण सुपात आहेत. काही जण जात्यात आहेत अशा सर्वांवर कारवाई होणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.