Rajya Sabha Election : महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणार; संजय राऊत
महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकारमध्ये कोणीही कोणावरही नाराज नाही. महाविकास आघाडीने दिलेले चारही उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) निवडून येतील असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षाकडून चूकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यात येणाऱ्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानापूर्वी काही मराठी वृत्तवाहिन्यांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांत मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. याबाबत राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अशा प्रकारच्या बातम्या कालपासून विरोधी पक्षाच्या लोकांकडून पसरवल्या जात आहेत. प्रत्यक्षात महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून आमचे चारही उमेदवार विजयी होतील.
राज्यसभा निवडणुकीत काँटे की टक्कर, चुरशीची लढाई असं जे चित्र निर्माण केलं जात आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं राऊत यांनी म्हटले आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे प्रत्येकी एक उमेदवार हे पहिल्या फेरीत निवडून येतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला आजही 169 आमदारांचा पाठिंबा असून आजच्या मतदानात तुम्हाला हे आकडे स्पष्टपणे दिसतील असे राऊत यांनी सांगितले.