हेरवाड घटनेनंतर विधवांचा सन्मान करू नका; CM ठाकरे, नीलम गोऱ्हेंना धमकीचा मेल
मुंबई : राज्यात ५ मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील ग्राम पंचायतीने विधवा प्रथेसंदर्भात क्रांतिकारी निर्णय घेतला होता. या निर्णयाचे राज्यातील सर्वच स्तरातून स्वागत झाले. या गावाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने देखील १७ मे, २०२२ रोजी एक विशेष परिपत्रक काढून सर्व ग्रामपंचायतींनी याचे अनुकरण करावे, असे आवाहन केले आहे. परंतु, हेरवाड घटनेनंतर विधवांचा सन्मान करू नका, असा धमकीचा मेल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मान्यवरांना आला आहे. यावर उपसभापती कार्यालयाकडून नगर पोलीस अधीक्षकांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्त्री आधार केंद्र, उपसभापती कार्यालय आणि विधवा सन्मान कायदा समिती अभियान यांच्या वतीने पुणे येथे सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांची एक 'परिवर्तन बैठक' २४ मे रोजी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीची आयोजनाची बातमी प्रसारित झाल्यावर अहमदनगर जिल्ह्यातील एका माथेफिरू व्यक्तीने मुख्यमंत्री, उपसभापती कार्यालय, स्त्री आधार केंद्र तसेच अन्य मान्यवरांना हेरवाडच्या या निर्णयाचे समर्थन करणारे कार्यक्रम न घेण्याबाबत एक मेल २५ मे रोजी पाठविला. सदर निवेदनात पत्रलेखकाने त्याच्या स्वत:च्या आईला कोपर्डी अथवा कोठेवाडी येथे नेऊन बलात्काराची धमकी दिली आहे.
विधान परिषद, उपसभापती कार्यालयाने या विषयाची गंभीर दखल घेतली असून याबाबत अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मेलची प्रत त्यांच्याकडे दिली आहे, तसेच, सदर व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची सूचनाही केली आहे. त्याचबरोबर शेवगावचे पोलीस उपअधीक्षक मुंडे यांनी याबाबत सदरील व्यक्ती मनोरुग्ण असून तो असे समाजात विकृत पद्धतीचे संदेश देणारे काम करत असतो. परंतु, २५ मे २०२२ रोजी केलेला संदेश अतिशय गंभीर असून याबाबत कडक कारवाई लवकरच करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
याबाबत सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार दखल करून अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना वेळीच रोखण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
यावर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांना दूरध्वनी केला असून या प्रकरणाची तातडीने चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे.