OBC Community : भाजपचे बडे नेते ताब्यात, कार्यकर्त्यांचीही धरपकड
राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण (Political reservation to OBC community) मिळावे, यासाठी भाजपने वेळोवेळी आक्रमक आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्य सरकार या विषयाकडे गांभीर्याने बघत नसल्याने ओबीसी समाजाचा संयम सुटत चालला आहे. दरम्यान ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर मध्यप्रदेश सरकारनं हे आरक्षण परत मिळवलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारनेही त्याच पार्श्वभूमीवर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठीच आज (25 मे) महाराष्ट्र भाजपा आक्रमक झाली असून मुंबई कार्यालय ते मंत्रालय असा मोर्चा काढण्यात आला आहे.
या मोर्चाचं नेतृत्व योगेश टिळेकर करत आहेत. चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार असे अनेक प्रमुख नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चामध्ये महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात बाचाबाचीही झाली.
भाजप कार्यकर्त्यांची धरपकडमध्ये प्रवीण दरेकर ( Praveen Darekar), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर काही महिला कार्यकर्ते आणि इतर आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजपा कार्यालयासमोर या महिला कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे.