गडचिरोली जिल्ह्यात दोन वनरक्षकांना नक्षल्यांकडून बेदम मारहाण
व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली | गडचिरोली जिल्ह्यात दोन वनरक्षकांना नक्षल्यांकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जागेश्वर चुलगाय आणि हुकेश्वर राऊत असे या दोन दोन वनरक्षकांचे नाव आहे. जखमी वनरक्षकांवर प्राथमिक उपचार करून शासकीय निवासस्थानात ठेवण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड वनविभागाच्या दोन वनरक्षकांना काल 11 जानेवारी रोजी नेलगुंडा गावालगतच्या जंगल परिसरात नेऊन नक्षल्यांनी मारहाण केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. भामरागड वनविभागात येत असलेल्या गट्टा वनपरिक्षेत्रातील नेलगुंडा क्षेत्रात कामकाजाकरीता गेले असता वनरक्षक जागेश्वर चुलगाय आणि हुकेश्वर राऊत हे आपले काम आटोपून परत येतांना दोन अज्ञान इसमांनी त्यांना जंगलात घेऊन गेले. दरम्यान इथून पळण्याचा प्रयत्न केला तर ठार मारू अशी हुलकावणी दिली. त्यानंतर त्या दोन्ही वनरक्षकांना नक्षल्यांनी बेदम मारहाण केली. काही वेळानंतर त्यांच्याकडे असलेली दुचाकी वाहन, मोबाईल, जीपीएस मशीन आणि पीओआर बुक नक्षल्यांनी ताब्यात घेतले आणि यापुढे तुम्ही आम्हाला दिसल्यास ठार मारू अशी धमकी दिली. यात जखमी झालेल्या वनरक्षकांना रात्री 1 वाजताच्या सुमारास आलापल्ली येथे आणण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून शासकीय निवासस्थानात ठेवण्यात आले आहे.