‘मै लडकी हू, लड सकती हू’,; प्रियंका गांधी देणार महाराष्ट्रात नारा
व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्नशील असतात. यासाठी नेहमी प्रियंका गांधी 'मै लडकी हू, लड सकती हू' असा नारा देत असतात. हाच नारा आता प्रियंका गांधी महाराष्ट्रात देणार आहेत. गडचिरोलीत येऊन प्रियंका गांधी 10 हजार विद्यार्थिनींना ई-सायकल वाटप करणार आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या १४ डिसेंबर रोजी गडचिरोली येथे येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. या दरम्यान अखिल भारतीय काँग्रेसच्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील १० हजार विद्यार्थिनींना मोफत ई-सायकल देण्यात येणार आहेत. सदर सामाजिक कार्यक्रम १४ डिसेंबर रोजी येथील जिल्हा परिषदेच्या बाजूला असलेल्या मैदानावर १०.३० ते ११.३० वाजताच्या दरम्यान पार पडणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार व प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, ऍड. राम मेश्राम, पंकज गुड्डेवार, सतीश विधाते, पांडुरंग घोटेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
युवती व महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रियंका गांधी विशेष प्रयत्नशील असून 'मै लडकी हू, लड सकती हू' असा नारा त्यांनी दिला आहे. आपली कर्मभूमी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दिद्यार्थिनींना वाहतुकीच्या सोयी-सुविधा अपुऱ्या असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अनेक विद्यार्थिनी शाळेत पायदळ येतानाचे चित्र आहे. त्यामुळे सामाजिकतेचे भान ठेवत गडचिरोली जिल्ह्यातील १० हजार विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिवानी वडेट्टीवार यांनी दिली.